२०२० च्या पीक विम्याची सद्यस्थिती
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खरीप पीक विमा २०२० संदर्भात एक महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आला आहे. यापूर्वी, २४ नोव्हेंबरला कोर्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आता विम्याचे वितरण लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विम्यात कोर्टाकडे जमा असलेली रक्कम आणि राज्य शासनाकडून मिळणारी रक्कम मिळून एकूण सव्वा दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे.
बँक खात्यात ९२.९३ कोटी जमा
प्रक्रियेनुसार, ६ डिसेंबर २०२५ रोजी कोर्टाकडे जमा असलेली रक्कम आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विम्याच्या वितरणासाठी खास उघडण्यात आलेल्या ‘इस्रो’ (Escrow) अकाउंटमध्ये जमा करण्यात आली आहे.
याच खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून देय असलेली साधारणपणे १३४ कोटी रुपयांची रक्कम देखील लवकरच जमा केली जाणार आहे, जी साधारणपणे १५ डिसेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू
सध्या समाजमाध्यमांवर (Whatsapp) पीक विम्याच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या पसरवल्या जात असल्या तरी, कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, या याद्या आणखी परिपूर्ण नाहीत. या याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांची माहिती जोडणे बाकी आहे किंवा त्या याद्या अद्ययावत (Updated) करणे बाकी आहे. अशा सुधारित आणि अंतिम याद्या साधारणपणे १० डिसेंबरनंतर तयार होतील आणि या याद्या तयार झाल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून त्या प्रसारित केल्या जातील, अशी माहिती समोर आली आहे.
कधी होणार पीक विम्याचे वितरण?
‘इस्रो’ खात्यामध्ये कोर्टाकडील ९२.९३ कोटी आणि राज्य सरकारकडून येणारे १३४ कोटी अशी संपूर्ण निधीची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच पीक विम्याचे वितरण सुरू केले जाईल. राज्य शासनाच्या १३४ कोटीचा जीआर निर्गमित होऊन पैसे खात्यात आल्यानंतर, तिथून पुढे दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये पीक विम्याचे प्रत्यक्ष वितरण होऊ शकते. सध्याच्या हालचाली पाहता, हे वितरण डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विम्यामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ९,००० रुपये या प्रमाणानुसार पीक विमा वितरित होण्याची शक्यता आहे.